Disqus Shortname

आत्ता वाचण्यासारखे :

आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी "नाशिक मिसळ जनविकास आघाडी" ची स्थापना

 
नाशिक शहरात २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणूक होणार आहे आणि साधारण ३५ प्रभाग असण्याची शक्यता आहे. एका प्रभागात ४ प्रमाणे १४० नगरसेवक असतील अशी साधारण स्थिती आत्ता आहे. निवडणुकीला फारसा कालावधी बाकी नसताना प्रस्थापित पक्ष मात्र अजूनही संभ्रमात आहेत कि स्वबळावर लढायचे कि युती / आघाडी करुन. तसेच उमेदवार कोण असेल हे सुद्धा अजून ठरत नाही त्यात मोठ्याप्रमाणावर येणाऱ्या आयाराम गयाराम मुळे सगळेच अनिश्चितआहे. 
 
 

 
असे असले तरी नाशिक मधील सगळे मिसळ पाव विक्रेते एकत्र आले आहेत आणि त्यांनी  "नाशिक मिसळ जनविकास आघाडी" स्थापन करून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नाशिकची मिसळ हि जग प्रसिद्ध आहेच त्यामुळे हा निर्णय घेतला असे संघटनेने सांगितले आहे.  

 
 
"नाशिक मिसळ जनविकास आघाडी" चे काही प्रमुख मुद्दे:

 
खरे नगरसेवक "मिसळ पाव" वालेच … नाशिकची आमच्या इतकी सेवा कोणीही करत नाही.  

आम्हीच नाशिकची खरी ओळख आहोत.  

आमच्या दुकानात इतक्या राजकारणाच्या गप्पा होतात, इतके राजकारणी येतात मग आम्हीच राजकारणात यायला काय हरकत आहे ?

आम्ही सर्व जाती, धर्म आणि पंथांना समान न्याय देतो. 

 
आजच्या पहिल्या सभेत झालेले काही प्रमुख निर्णय:

मिसळ पाव च्या धंद्यात होणारे परकीय अतिक्रमण संपविण्यासाठी आयुक्तांना साकडे 

नवीन विकास आराखड्यात मिसळ पाव दुकानांना खास आरक्षण मिळावे तसेच सकाळी ८ ते १२ वेळात पार्किंगसाठी सूट मिळावी 

मिसळपावयुक्त प्रभाग योजना राबविणार जेणेकरून शहरभर "मिसळ पाव" सिंचन होणार  

महाविद्यालयीन युवकांना एका मिसळीवर ८ पावापर्यंत सरकारी अनुदान … आधार क्रमांकाने थेट बँकखात्यात जमा होणार 

पाव निर्मितीला चालना मिळावी म्हणून "मेक इन नाशिक" योजना आणणार 

दर ३ वर्षांनी "मिसळ कुंभ" साजरा करणार! त्यासाठी "केंद्र आणि राज्य सरकार" कडे निधीसाठी पाठपुरावा करू 

नाशिक मध्ये एक "मिसळ स्ट्रीट" तयार करणार तिथे फक्त पादचारी आणि साईकलस्वार असतील इतर वाहनांना बंदी 

बहुमत मिळाल्यास एका मिसळी बरोबर ३ पाव देणार त्यासाठी पिझ्झा, बर्गर वर ०.५% मिसळ पाव कल्याण अधिभार लावणार     

इंदिरानगर बोगदा वाहतूक कोंडी कायमची मिटविण्यासाठी बोगद्यामध्ये मिसळ पाव चे दुकान सुरु करणार

गंगापूर धरणात मिसळीच्या रस्स्यासाठी पाणीसाठा राखीव करणार


नुसती घोषणा करून न थांबता "नाशिक मिसळ जनविकास आघाडी" ने जागावाटप सुद्धा जाहीर केले. विशेष म्हणजे आघाडीचे जागावाटप करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  


मिसळ दुकानदार                                    ५०
मिसळ दुकानदार आर्थिक दुर्बल                 १० 
मटकी कडधान्य विक्रेता महासंघ               २०
पाव विक्रेते                                            १५
शेव पुरवठा संघ                                      १०
कांदा विक्री समिती                                   ५
लिंबू विक्रेते                                             ३    …
 
(बोलणी सुरु आहेत  कारण मागणी त्यांनी ५ जागांची मागणी केली आहे त्यामुळे उन्हाळा संपला कि भाव कमी झाल्यावर ठरवू आणि ३ जागा देवू )
 
दही वाटी वाले                                          २
महिला गृह उद्योग पापड विक्री संघटना       ४
ताक / लस्सी / सोलकढी विक्रेते                   ४
पानटपरी दुकानदार                                  २
मिसळ दुकान सेवा कर्मचारी संघटना          १०    
चहा विक्री संघ                                         ५
 
एकूण                                                   १४० 

निशाणी : अर्थातच "मिसळ पाव"  
  

एकूणच "नाशिक मिसळ जनविकास आघाडी" तयारी आणि उत्साह बघता भविष्यात महापालिकेत महासभेत "दादा थोडी तर्री" टाक असे आवाज ऐकू आले तर नाशिककरांनी नवल वाटू देवू नये. 
 
 
 
सूचना: 

सदरहू लेख हा Admin: www.minashikkar.com ने लिहिला आहे त्यामुळे कोणीही COPY / PASTE करू नये अन्यथा "काळा मसाला" तयार आहे